नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांच्या मान्सूनपूर्व नालीसफाईच्या मागणीला यश
जयपाल लाहोटी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्ष सफाई कामाला सुरुवात
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शहरातील विविध भागांमध्ये तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, घाण व कचरा साचल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिक व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः मोंढा बाजार समिती परिसर व खाडी नाला परिसरातील समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याने मान्सूनपूर्व नालीसफाई तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.
नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांच्या मागणीची नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत प्रभाग क्रमांक १३ मधील खाडी नाला तसेच मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. यावेळी जयपाल लाहोटी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व भावड्या कराड,नगरसेवक हाजीबाबु व रमेश पवार यांच्या उपस्थितीत सफाई मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
मान्सूनपूर्व साफसफाईमुळे पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार असून साचलेले पाणी, दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. नगर परिषद प्रशासनाकडून सफाईसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर तैनात करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळेत सुरू करण्यात आलेल्या या कार्यवाहीचे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
